कराड (सातारा) - फार्महाऊसवरील शेततळ्यात बुडून बहिण, भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना पाटण तालुक्यातील रोमनवाडी-येराड येथून समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली असून मासेमारी करणार्यांच्या साह्याने शोध घेऊन रात्री सातच्या सुमारास बहिण-भावाचे मृतदेह ( Sister Brother Drowned in Satara ) बाहेर काढण्यात आले. सौरभ अनिल पवार (वय 16) आणि पायल अनिल पवार (वय 14, रा. काठी, ता. पाटण), अशी त्यांची नावे आहेत.
भावाला वाचविताना बहिणही बुडाली -
काठी (ता. पाटण) येथील अनिल पवार हे पत्नी आणि दोन मुलांसमवेत रोमनवाडी-येराड येथील फार्म हाऊसवर कामाला असलेल्या सचिन जाधव या नातेवाईकाकडे आले होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिल पवार यांची मुले सौरभ व पायल ही फार्महाऊसवरील पाण्याने काठोकाठ भरलेल्या शेततळ्याकडे गेली होती. सौरभ शेततळ्यातील पाण्यात बुडताना पाहून भावाला वाचविण्यासाठी गेलेली बहिण पायलही शेततळ्यात बुडाली.