सातारा- तालुक्यातील वाढीव एमआयडीसीसाठी टप्पा क्र. 3 व 4 मधील देगाव, निगडी आणि वर्णे याठिकाणी योग्य दर मिळाला तर शेतकरी जमिनी देण्यासाठी तयार होतील. रोजगारनिर्मिती, भुमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळण्यासाठी आणि सातारा तालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने वाढीव एमआयडीसी होणे काळाची गरज आहे. याठिकाणी 11 लाख रुपये हेक्टरी एवढा उच्चतम दर आहे. नवीन कायद्यानुसार चारपट म्हणजेच 44 लाख रुपये हेक्टरी दर शेतकऱ्यांना मिळू शकतो. मात्र, तडजोडीअंती शेतकर्यांना हेक्टरी 50 ते 60 लाख रुपये दर मिळावा, अशी मागणी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. 3 (देगांव) आणि टप्पा क्र. 4 (निगडी- वर्णे) भूसंपादनाबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी भूसंपादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा दर याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी आ. प्रभाकर घार्गे, औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, साताऱ्याचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सातारा एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, भूमापक खापरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.