सातारा- लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन शरद पवारांनी घडवून आणले होते. याची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. मात्र, काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यावेळी मोठ्या पवारांनी दोन्ही राजेंना एकत्र करून मनोमिलन केले होते. पण शिवेंद्रराजे यांच्या काही कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली असल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कधीच काही खरे नसते याचा अनुभव अनेकदा राजकीय नेते मंडळींना आला आहे. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, पक्षांतर्गत असलेली धुसफूस कायम दिसून येत आहे. उदयनराजेंनी मात्र प्रत्येक पक्षात आपला एक गट निर्माण करून ठेवला आहे. भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे ते कोणाचेच नाहीत आणि सर्वांचेच आहेत, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण त्यांनी केली आहे.