सातारा - नगरपालिका निवडणुका तोंडावर असल्याने पालिकेतील परस्परांचे प्रतिस्पर्धी, भाजपचे खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. आता परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे. त्याच पद्धतीने निवडणूक म्हटले की, पालिकेतील सत्ताधारी नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडणारच, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला आहे.
हेही वाचा -आम्ही नुसता शब्द देत नाही तर पाळतोही, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्ष टोला
कमिशन, टक्केवारी आणि टेंडरसाठी कळवंडी
सातारा पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागात पथदिव्यांचे उद्घाटन मंगळवारी झाले. त्यावेळी खासदार उदयनराजेंनी, आम्ही नुसता शब्द देत नाही, तर पाळतोही, असा चिमटा काढला होता. त्याला आज शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर दिले. शिवेंद्रसिंहराजे एका प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हणतात, गेल्या साडेचार वर्षांत सातारा पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडरसाठी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अनेकदा कळवंडी झाल्या, एकमेकांचे गळे धरले गेले. मात्र, त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून नेत्यांनी आता निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे लक्षात येताच नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्याचा सपाटा सुरू केला आहे. सातारकरांचे काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेवूनच 'खोटे बोल पण रेटून बोल' हा नेहमीचा पायंडा सुरू ठेवला आहे.