सातारा -गेल्या साडेचार वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी हा केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे. त्यामुळे पालिकेतील 'कचरा' हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.
विकासकामांचा पाऊस दाखवून भुलवण्याचा उद्योग -
सातारा पालिकेच्या आगामी बैठकीत विविध विकास कामांसाठी तरतूद केली असल्याची माहिती खासदार उदयनराजेंनी दिली आहे. त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्राद्वारे टिका केली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे, "गेल्या साडेचार- पावणेपाच वर्षात सातारा पालिकेत सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांमध्ये टेंडर टक्केवारीसाठी लागणारी कळवंड सातारकर उघड्या डोळ्याने पाहत आले आहेत. या कळवंडीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न नेत्यांना अनेकदा करावा लागला. नेते भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत असा नुसता ढोल बडवून अन् डांगोरा पिटून पालिकेतील भ्रष्ट कारभाराचे सत्य लपवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. वास्तविक सातारा पालिकेला सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरन बनवले असून सत्ताधाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. आता परवाच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना काढल्याने सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरु केला आहे.
साधे आयसोलेशन सेंटर केलं नाही -