महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 5, 2020, 6:03 PM IST

ETV Bharat / state

सलून दुकानेही पुर्ववत सुरू करा; आमदार शिवेंद्रराजे यांची मागणी

सातारा जिल्ह्यात इतर दुकानांसह सलूनची दुकानेही सुरू झाली होती. पाचव्या लॉकडाऊनमध्ये सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे नाभिक समाजातील सलून चालक, मालक आणि कारागिरांचे जगणे मुश्किल झाले आहे, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले आहे.

Shivendrasinhraje Bhonsale
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा- सलग दोन-तीन महिने सलून दुकाने बंद होती आणि आता पुन्हा दुकाने बंद झाल्याने सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांची आणि लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने सलून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यंमत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ईमेल केला आहे.

कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली असताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मॉल, रेस्टॉरंट, बार वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने, व्यवसाय सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यात इतर दुकानांसह सलूनची दुकानेही सुरू झाली होती. दरम्यान, पाचवा लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे नाभिक समाजातील सलून चालक, मालक आणि कारागिरांचे जगणे मुश्किल झाले आहे, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकताच मॉल आणि रेस्टॉरंट सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सगळे व्यवसाय सुरू झाले. पण, फक्त सलून दुकानेच बंद का? सलून दुकाने बंद ठेवून काय साध्य होणार आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. लोकांनाही केस कापणे, दाढी करणे यासाठी सलून दुकाने सुरू असणे आवश्यक आहे. त्यामुळे सलून दुकाने बंद ठेवणे हा नाभिक समाजावरील अन्याय आहे.

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सलून चालक, मालक व कारागिरांची उपासमार टाळण्यासाठी कोरोनासंबंधित नियम व निर्बंध घालून सलून दुकानेही पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details