कराड (सातारा) -ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर वन पर्यटन योजनेतून शिवसृष्टी उभारण्याची मागणी नागरीकांनी सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. शिवसृष्टी प्रकल्पासाठी आपण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आवश्यक तो पाठपुरावा करून शिवसृष्टी साकारणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास चिरंतन रहावा, भावी पिढीला प्रेरणा मिळावी, सदाशिवगडाच्या ऐतिहासिक वैभवात भर पडावी तसेच सदाशिवगड परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी शिवसृष्टी उभारण्यासह सदाशिवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, अशा मागणीचे पत्र वनवासमाची, राजमाची, हजारमाची, बाबरमाची आणि विरवडे या पाच गावांतील सरपंच तसेच पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले. वन पर्यटन योजनेत सदाशिवगडाचा समावेश व्हावा. गडाची तटबंदी, बुरूज व प्रवेशद्वाराची निर्मिती व्हावी. शिव जन्मकाळापासून राज्याभिषेकापर्यंतचे इतिहासातील प्रमुख प्रसंग शिल्प आणि चित्ररूपात साकारण्यात यावेत. शिवसृष्टी साकारल्यास शिवप्रेमींसह पर्यटकांचा ओढ वाढून सदाशिवगड परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल, असेही पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.