महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Balasaheb Thackeray Study Center : शिवसैनिकाने सुरू केलेले 'बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र' पीएचडी करणार्‍यांसाठी ठरतेय विद्यापीठ, वाचा हा खास रिपोर्ट

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97वी जयंती आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणारे लाखो शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत. सातार्‍यातील महेश पाटील नावाच्या शिवसैनिकाने उंब्रजमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत बाळासाहेबांच्या नावाने सुरू केलेले अभ्यास केंद्र आज पीएच. डी. करणार्‍यांसाठी विद्यापीठ बनले आहे. अभ्यास केंद्राविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा खास रिपोर्ट वाचा.

Balasaheb Thackeray Study Center
बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र

By

Published : Jan 23, 2023, 3:07 PM IST

शिवसैनिकाने सुरू केलेले बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र

सातारा :महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर 19 जून 1966 या दिवशी एका वादळाचा जन्म झाला. त्या वादळाचे नाव होते शिवसेना. सुरूवातीला संघटना म्हणून उदयास आलेल्या शिवसेनेचा पुढच्याच वर्षी राजकीय प्रवास सुरू झाला. तेव्हापासून शिवसेना नावाचे वादळ महाराष्ट्रात घोंघावत आहे.


कोण आहे हा अवलिया?सातारा जिल्ह्यातील ओगलेवाडी रेल्वे स्टेशनजवळचे विरवडे (ता. कराड) हे महेश पाटील यांचे मूळ गाव. मात्र, उंब्रजमध्ये ते टेलरिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी 1991 साली विरवडे गावात शिवसेनेची शाखा स्थापन केली. तेव्हापासून शिवसैनिक म्हणून ते झपाटून काम करत आहेत. शिवतीर्थावरील दसरा मेळावा, शिवसेनेचा वर्धापन दिनाला ते आवर्जुन हजर असतात. त्यानंतर आता शिवसेनाप्रमखांची जयंती आणि स्मृतिदिनालाही न चुकता मुंबईला जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करतात. त्यांनी बाळासाहेबांच्या 20 सभा प्रत्यक्ष उपस्थित राहून ऐकल्या आहेत. त्यामुळे या अवलिया शिवसैनिकाला उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पक्षातील नेते, उपनेते, संपर्कप्रमुख नावानिशी ओळखतात.

बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र


पुस्तकांचे अभ्यास केंद्र :दैनिक सामना सुरू झाल्यापासून महेश पाटील हे सामनाचे वाचक आणि संग्राहक आहेत. पहिल्या अंकापासून त्यांनी दैनिक सामना तसेच साप्ताहिक मार्मिकचे अंक जपून ठेवले आहेत. तसेच बाळासाहेबांच्या पुस्तकांचा देखील त्यांच्याकडे संग्रह आहे. याशिवाय बाळासाहेबांच्या भाषणांची कॅसेट, सीडी देखील त्यांनी जपून ठेवल्या आहेत. अंगार, एक विचार धगधगता, हिंदुत्वाचा यज्ञकुंड, साहेब, फटकारे, डरकाळी शिवतीर्थावरची, असे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सम्भवामि युगे युगे, विचारधारा, अशा पुस्तकांचा संग्रह आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पीएचडी करत असताना पत्रकार राधेश्याम जाधव हे महेश पाटील यांच्या घरी आले होते. त्यांच्याकडील विपुल संग्रह पाहून जाधव यांनी अभ्यास केंद्र सुरू करण्याचा सल्ला दिला. महेश पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीसाठी अर्ज केला. बाळासाहेबांचे नाव वापरण्याची परवानगी देखील ठाकरे कुटुंबाने दिली आणि उंब्रजमध्ये हिंदुह्रदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका व सामाजिक संस्था सुरू झाली. आज हे अभ्यास केंद्र पीएचडी करणार्‍यांसाठी विद्यापीठ बनले आहे.

बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र


फोन करून बाळासाहेबांना शुभेच्छा :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 2006 सालचा वाढदिवस महेश पाटील यांच्यासाठी संस्मरणीय ठरला. त्या दिवशी त्यांनी एसटीडी बुथवरून थेट मातोश्रीवर फोन केला. स्वत: बाळासाहेबांनी फोन रिसीव्ह केला आणि महेश पाटील यांनी थेट शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा बाळासाहेब आपल्याशी दीड मिनिटे बोलले होते, अशी आठवण ते सांगतात. त्या कॉलचे बील त्यांनी आठवण म्हणून आजही जपून ठेवले आहे. तसेच 23 जानेवारील 2012 ला वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची रूद्राक्ष तुला करण्यात आली होती. त्या रूद्राक्षांचे आशिवार्द म्हणून शिवसैनिकांना वाटप केले होते. मुंबईला जाऊन महेश पाटील यांनी दोन रूद्राक्ष घेतले. एक रूद्राक्ष त्यांच्या गळ्यात आणि एक सतत जवळ असतो.

बाळासाहेब ठाकरे अभ्यास केंद्र


राणेंची हकालपट्टी ते शिवसेनेची सत्ता :नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी ते शिवसेनेची सता, असे अंक जपून ठेवायचा निश्चय महेश पाटील यांनी केला होता. त्याप्रमाणे त्यांच्या संग्रहात नारायण राणे यांची शिवसेनेतून झालेली हकालपट्टी ते उध्दव ठाकरे मुख्यमंत्री अर्थात शिवसेनेची सत्ता, असे अंक पहायला मिळतात. सामनाचा पहिला अंक, मार्मिकचा पहिला अंक आणि बाळासाहेबांच्या मुलाखतींचे अंक देखील त्यांनी जपून ठेवले आहेत. सुरूवातीचे काही अंक वाळवीमुळे खराब झाले. मात्र, नंतर त्यांनी काळजीपूर्वक अंक जपले. पुणे-बंगळुरू महामार्गावरून जाता-येता शिवसेना नेते आवर्जुन त्यांच्या घरी भेट देतात. एका सामाजिक कार्यकर्त्याने आणि मुंबईतील संपर्कप्रमुखाने दिलेल्या दोन लोखंडी रँकमुळे अभ्यास केंद्रातील पुस्तके, अंक सुरक्षित ठेवण्यास मदत झाली आहे.


अस्सल शिवसैनिक :कराडच्या प्रीतिसंगमावर फेब्रुवारी 2004 साली नाट्य संमेलन झाले होते. या संमेलनात दैनिक सामनाचा स्टॉल लावण्यात आला होता. बाळासाहेबांचे सहकारी आणि सामनाचे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई हे स्टॉलवर उपस्थित होते. 300 रूपयात व्यंगचित्र काढून तीन महिने सामना आणि मार्मिक मोफत मिळणार, अशी स्कीम होती. महेश पाटील यांनी लगेच तीनशे रूपये दिले. प्रभुदेसाईंनी तुम्ही कोण आहात, असे विचारले. त्यावर मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, असे महेश पाटील म्हणाले.


स्वखर्चाने मुलांना खाऊवाटप :शिवसेनाप्रमुखांच्या जयंती दिनी महेश पाटील हे विरवडे, उंब्रज गावातील प्राथमिक शाळेत स्वखर्चाने मुलांना खाऊ वाटप करतात. तसेच त्यांच्या अभ्यास केंद्राला भेट देणार्‍या मान्यवरांना भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार करतात. तसेच बाळासाहेबांच्या जयंती, स्मृतिदिनासाठी आदल्या दिवशी रात्री मुंबईला जायला निघतात. सकाळी स्मारकस्थळी जाऊन वंदन करतात. हा शिरस्ता त्यांनी आजही पाळला आहे. यामुळेच लाखो शिवसैनिकांमध्ये सातार्‍यातील या अवलिया शिवसैनिकाची वेगळी ओळख आहे.

हेही वाचा : Balasaheb Thackeray Jayanti : बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीसाठी शिवतीर्थावर जय्यत तयारी

ABOUT THE AUTHOR

...view details