सातारा -प्रतिवर्षी २१ डिसेंबरला साजरा होणारा शिवप्रताप दिन यंदा प्रतापगडावर शासनामार्फत साजरा करण्यात येणार आहे. वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने व इतर ठिकाणी साजरे करण्यात येणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिवप्रताप दिन साध्या व कमीत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
शासनामार्फत फक्त प्रतापगडावर साजरा होणार शिवप्रताप दिन; इतर ठिकाणचे कार्यक्रम रद्द - chhatrapati shivaji maharaj
यंदाचा शिवप्रतापदिन शासनाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २१ डिसेंबरला किल्ले प्रतापगडावर साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी इतर ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारऱ्यांनी दिली.
शिवप्रताप दिनाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर -चौगुले, महाबळेश्वर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे आदी उपस्थित होते.
फक्त शासकीय कार्यक्रम होईल-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ डिसेंबरला शिवप्रताप दिनी प्रतापगडावर होणारे धार्मिक कार्यक्रम पारंपरिक रितीरिवाजानुसार, साध्या पद्धतीने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात यावेत. प्रतापगडावर देवीची पूजा, ध्वजारोहण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात यावा. एवढेच शासकीय कार्यक्रम घ्यावेत. सोहळ्यादरम्यान कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत व कार्यालयामार्फत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याबाबत पोलीस विभागामार्फत योग्य ती कार्यवाही व बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या आहेत.
प्रतापगड उत्सव समितीचा कार्यक्रमही रद्द
वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येणारा शिवप्रताप दिन सद्याच्या परिस्थितीमुळे व आदेशामुळे करता येणार नाहीत, असे वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापूरकर-चौगुले व तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. वाई येथील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने वीर जीवा महाले पुरस्कार चारुदत्त आफळे, संताजी काका वकील बोकील पुरस्कार गोरक्षक अॅड. कपिल राठोड यांना देण्यात येणार होता. परंतु सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असे प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांनी सांगितले.