सातारा: वाई, लोणंद, फलटण, कोरेगावमध्ये राष्ट्रवादीने तर वडूजमध्ये माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या आघाडीने वर्चस्व सिद्ध केले. पाटण शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलने १५ जागा जिंकत तब्बल 40 वर्षानंतर सत्तांतर घडवले. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पॅनेलला ३ जागा मिळाल्या. शंभूराज देसाई हे कॅबिनेट मंत्री आणि सातारा, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पाटण बाजार समितीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
कॉंग्रेसची सत्ता कायम:कराड बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील यांच्या लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेलने 12 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे कार्यकरिणी सदस्य अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलला 6 जागांवर समाधान मानावे लागले.
उदयनराजेंच्या पॅनेलचा पराभव:सातारा बाजार समिती निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत सर्व १८ जागा जिंकत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या अजिंक्य पॅनेलने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि खासदार उदयनराजे भोसले गटाच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. खासदार उदयनराजे भोसले गटाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनेलच्या आडून बाजार समितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला.
वाईत राष्ट्रवादी पुन्हा:वाई बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सत्तारूढ सहकार प्रगती पॅनेलने सर्व ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. यापूर्वी सत्ताधाऱ्यांचे ६ आणि विरोधकांचा १ सदस्य बिनविरोध निवडून आला होता.