सातारा:सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर हे कोणत्याही सहकारी संस्थेवर पदाधिकारी राहण्यास सहकार कायद्यान्वये अपात्र ठरले आहेत. यामुळे चरेगावकरांना मोठा दणका बसला आहे. चरेगावकर हे डिफॉल्टर आहेत. वाई अर्बन बँकेने ते थकित कर्जदार आहेत. त्यांच्याकडे 5 कोटी 45 लाख 9 हजार रूपयांचे कर्ज थकित आहे. वाई अर्बन बँकेसह अन्य संस्थांनी त्यांच्याविरूध्द वसुली प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याची माहिती, फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांनी पत्रकार परिषदेत दिली.
चरेगावकर थकित कर्जदार: शेखर चरेगावकर यांच्याविरुद्ध वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने सहकार अधिनियम, 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. वाई अर्बन बँकेचे 5 कोटी 45 लाख 9 हजार 973 रूपयांचे कर्ज थकित आहे. तसेच यापूर्वी सारस अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड कर्वे नगर, पुणे यांनी 56 लाख 9 हजार इतक्या थकित कर्ज वसुलीचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. सहकार अधिनियमान्वये जी व्यक्ती कोणत्याही अन्य संस्थेमध्ये परतफेड कसुरदार किंवा डिफॉल्टर असते, तिला कोणत्याही सहकारी संस्थेच्या कार अधिनियम व्यवस्थापन मंडळात पदाधिकारी होता येत नाही.
बँकेच्या अध्यक्षपदासह सहकार भारतीचे सचिवपद:शेखर चरेगावकर यांच्याकडे यशंवत बँकेच्या अध्यक्षपदाखेरीज सहकार भारती सहकारी प्रशिक्षण संस्थेचे सचिवपद, यशवंत प्रतिष्ठानचे कार्यकारी पद आहे. यशंवत बँकेच्या ठेवीदारांनी यासंदर्भात सहकार आयुक्त तथा पुणे येथील निबंधकांकडे तक्रार केली होती. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे देखील या बाबीची नोंद झाली आहे. शेखर चरेगावकर हे सहकारी कायद्यानुसार कोणत्याही सहकारी संस्थेवर पदाधिकारी राहण्यास अपात्र झाले आहेत, असे ठेवीदारांनी स्पष्ट केले. यावेळी अॅड. संजीव कुलकर्णी, विनोद कदम, संदीप घळसासी, अॅड. अमित द्रविड उपस्थित होते.