सातारा - महागाई आणि बेरोजगारीमुळे देशात उपासमारीची संख्या वाढली असून, सध्या अर्थिक मंदीवरही भाजपचे नेते बोलत नसल्याची टीका काँग्रेसवासी झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. 'हर बार सवाल कुछ और, जबाव कुछ और', असे भाजप नेत्यांचे वर्तन असल्याचे ते म्हणाले. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना धारेवर धरले.
यावेळी, महागाई आणि बेरोजगारीमुळे देशात उपासमारीची संख्या वाढली असून, त्यासंदर्भात 117 देशांचा सर्व्हे करण्यात आल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. या सर्व्हेनुसार जगभरातील देशांमध्ये भारत 102 व्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. आपल्यापेक्षाही पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या देशांमधील उपासमारीची संख्या कमी असून यातूनच देशातील वास्तव समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले.
जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि कराड दक्षिणमधील उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी आलेल्या सिन्हा यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
सध्या देशात दररोज 3 लाख लोक बेरोजगार होत आहेत. तसेच रोजगार, महागाई, उपासमारीबाबत जनता जाब विचारायला लागली की सत्ताधारी 370 कलमावर बोलत असल्याची टीका त्यांनी केली.