सातारा- साताऱ्यात आज दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आपण हरायचे नाही. राज्य सरकारकडून दुष्काळावर मात करण्यासाठी मदत घेऊ आणि आपण सर्व मिळून पुन्हा दुष्काळ येऊ नये यासाठी प्रयत्न करू, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना केले आहे.
शरद पवारांचा दुष्काळी भागाचा दौरा, साताऱ्यातील गावांना दिली भेट - शिंदे
शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला.
सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी, नागेवाडी या गावात जाऊन तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती शरद पवार यांनी जाणून घेतली. यावर्षी पाऊस उशिरा येईल, असा हवामान खात्याचा अंदाज असून नंतर पाऊस चांगला पडेल, असे म्हटले जात आहे. परंतु, त्यासाठी आपण तयार राहायला हवे. पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पाणी फाउंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे, त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटते, असे शरद पवार म्हणाले.
आज अनेक गावांमध्ये टँकरची मागणी आहे. रेशनकार्डवर धान्य मिळत नाही, अशी तक्रार शेतकरी करत आहेत. चारा छावण्या गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी, अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम्ही या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवू. या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा ठाम विश्वास पवार यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.