सातारा - अजित पवार आमचे नेते आहेत, असं बोललोच नसल्याचे सांगत शरद पवारांनी बारामतीतील वक्तव्यावर घुमजाव केलं. त्यामुळं आता नवीन राजकीय चर्चांना उधाण आलं. अजित पवार आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं शरद पवार शुक्रवारी सकाळी म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. (Sharad Pawar U Turn) (Sharad Pawar on Ajit Pawar) (Ajit Pawar Our Leader)
राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमचेच - राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादा आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य गुरूवारी सुप्रिया सुळेंनी केलं होतं. तो धागा पकडून शुक्रवारी सकाळी बारामतीमध्ये शरद पवारांना माध्यमांनी छेडले. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? काही लोकांनी पक्ष सोडला. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं.
काही तासात वक्तव्यावरून घुमजाव - शरद पवारांनी सकाळी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं. बारामतीहून शरद पवार दुपारी सातार्यातील दहिवडीच्या कार्यक्रमासाठी आले असताना सकाळी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी घुमजाव केलं. अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी बोललोच नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहीण आहे. बहीण-भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असा खुलासा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अजित पवारांना पुन्हा संधी नाही - एकदा जो पहाटे शपथविधी झाला, तो दोन लोकांचा शपथविधी होता. त्यात आमचेही एकजण सहभागी होते. माझ्याकडून जे झालं ते योग्य नव्हतं. आता त्या मार्गाने जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं, त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. संधी वारंवार मागायची नसते आणि मागितली तरी ती द्यायची नसते, असा सूचक इशारा त्यांनी अजित पवारांना दिला.
काय म्हणाले होते शरद पवार - काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. मात्र, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून पक्ष लगेच फुटला म्हणायचं काही कारण नाही, असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. तसेच अजित पवार हे आमचे नेते असल्याचंही ते म्हणाले होते. त्यामुळे नवीन चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आता पुन्हा शरद पवार यांनी घुमजाव केलं. मी असं बोललोच नसल्याचे ते म्हणाले.
मी पुन्हा एकदा सांगते की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील हे अध्यक्ष आहेत. पक्षातील नऊ आमदार, दोन खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांना नोटीस पाठवलेली आहे. माझं आणि संजय राऊत यांचं बोलणं झालं आहे. पक्षांमध्ये वेगळी भूमिका घेणाऱ्याना निलंबित करण्याबाबत पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. मी अजित पवारांसोबत गुप्त बैठका केलेल्या नाहीत. भावाला भेटायला गुप्तता बाळगण्याचे कारण नाही. आम्ही पारदर्शीपणे काम करतो. अजित पवारांना परत घेणार का? याविषयी बोलण्याइतपत मी मोठी नाही. शरद पवार सकाळी बोलले, तो त्यांचाच अधिकार आहे. ते आमचे सर्वोच्च नेते आहेत. ते आमचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया - अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करून ते उपमुख्यमंत्री झाले. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी २४ ऑगस्टला पुण्यात केलं होतं. आमच्यापैकी काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला आणि त्याबाबत तक्रार आम्ही सभापतींकडे केलेली आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या.
राजकीय चर्चांना उधाण -अजित पवार आमचेच नेते आहेत. वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली म्हणू शकत नाही, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. यानंतर राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. राजकीय नेते यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली. तर शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडावी, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
हेही वाचा -
- Supriya Sule On Ajit Pawar: 'राष्ट्रवादी'मध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे.. - सुप्रिया सुळे
- Vijay Wadettiwar On Sharad Pawar : शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडावी; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
- Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवारांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह? पवारांनी उत्तर द्यावे - संजय राऊत