सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे जाहीर सभा होणार आहे. उदयनराजे यांचा भाजप प्रवेश आणि पाटण तालुक्यातील राजकीय सद्यस्थितीवर पवार नेमके काय बोलणार, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा-पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर
पाटण विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील उपस्थित रहाणार आहेत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी मल्हारपेठच्या सभेत विक्रमसिंह पाटणकर यांना निवडून द्या. मी पाटण तालुक्याला लाल दिवा देतो, अशी साद घातली होती. त्यावेळी पाटणकर निवडून आले. मात्र, त्यांचे मंत्रीपद हुकले होते. विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच अवघ्या चार महिन्यात खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले भाजपमध्ये गेले. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा रिंगणात आले आहेत. त्यामुळे शरद पवार मल्हारपेठच्या सभेत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई आणि उदयनराजे भोसले यांचा समाचार घेणार हे निश्चित. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर भाजप प्रवेशावर आणि पाटण तालुक्यातील राजकीय सद्यस्थितीवर पवार नेमके काय बोलणार, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.