सातारा-आम्ही अनेक नेतृत्व घडवलेली आहेत. त्यामुळे सामनातील अग्रलेखाला महत्व देत नाही. त्यांना काय लिहायचे ते लिहू द्या, अशा शब्दांत शरद पवार यांनी
संजय राऊत यांना साताऱ्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही अनेक नेतृत्व घडवलेली आहेत. त्यामुळे सामनातील अग्रलेखाला महत्व देत नाही. त्यांना काय लिहायचे ते लिहू द्या, असे शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीत काय होते तो आमचा प्रश्न -राष्ट्रवादीत काय होते तो आमचा प्रश्न आहे, असे सांगत शरद पवारांनी संजय राऊतांना सूचक इशारा दिला. आम्ही पक्षात काय करतो, हे राऊतांना माहित नाही. विविध पातळ्यांवर पक्षात नेत्यांची फळी आहे. आम्ही काय करतो, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला त्यात समाधान आहे. त्यामुळे कुणी टीका केली तरी आम्ही लक्ष देत नाही. आम्ही कशाचीही प्रसिद्धी करत नाही. आमच्यालेखी सामनाच्या अग्रलेखाचे महत्त्व नाही.
|
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे कसे न्यायचे हे सर्वांना माहीत आहे. पक्षात नवीन नेतृत्वाला संधी दिल्याने काही जणांना मंत्रीपददेखील मिळाले आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आर आर पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. मी सुरुवात केली तेव्हा राज्यमंत्री म्हणून काम केले होते, ही आठवण करून दिली. मला कनिष्ठ मंत्री म्हणून काम केल्यानंतर बढती मिळाली. पण 1999 मध्ये मी या अनेकांना कॅबिनेट मंत्री केले. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचे काम पाहिल्याचे राष्ट्रवादी अध्यक्षांनी म्हटले आहे.
|
पृथ्वीराज चव्हाणांनी पक्षातील स्थान चेक करावे- राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकातील प्रचार सभेत केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांचे पक्षात स्थान ए आहे बी आहे की सी, डी आहे हे आधी चेक करावे. त्यांच्या पक्षापेक्षा पक्षातील त्यांच्या सहकार्यांना पृथ्वीराज चव्हाण यांची कॅटेगरी कोणती आहे विचारले तर ते तुम्हाला खासगीत सांगतील, असा जोरदार पलटवार शरद पवार यांनी केला. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे देशातील क्रमांक एकचे नेते असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.