महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उदयनराजेंच्या गडात शरद पवारांची सभा; काय बोलणार पवार? - sharad pawar in satara

राष्ट्रवादीची 'घडी' सुस्थितीत आणण्यासाठी शरद पवारांनी राज्यभर झंझावात सुरु केलेला आहे. राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांची तोफ सातार्‍यात धडाडणार असून पवार काय बोलणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

साताऱ्यात पवारांची सभा

By

Published : Sep 22, 2019, 11:46 AM IST

सातारा- राष्ट्रवादीचा मजबूत बालेकिल्ला उध्वस्त करणार्‍या सातारच्या राजांविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार पुकारलेला आहे. भाजपने सातारा-जावली मतदारसंघाचे शिवेंद्रराजे भोसले व माजी खासदार उदयनराजे भोसले यांना गळाला लावले. त्यानंतर राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यातील आपला गड शाबूत ठेवण्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे. आज राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांची तोफ सातार्‍यात धडाडणार असून पवार काय बोलणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा सुप्रिमो अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीची 'घडी' सुस्थितीत आणण्यासाठी शरद पवारांनी राज्यभर झंझावात सुरु केलेला आहे. पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे. उदयनराजे व शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशानंतर खासदार शरद पवार आज कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या अनुषंगाने सातार्‍यात येत आहेत. शरद पवार सातार्‍यात काय बोलणार, याकडे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेले जि. प. सदस्य दीपक पवारांना राष्ट्रवादीने गळाला लावले आहे. कालच दीपक पवारांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आज ते शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी शिवाजी सर्कल पोवई नाका येथून दुपारी 1 वाजता बाईक रॅलीने राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्याला सुरुवात होणार आहे. दीपक पवारांबरोबर भाजप-शिवसेनेतील काही नेतेमंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंविना हा मेळावा कसा पार पडेल, याकडेही जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details