सातारा- जिल्ह्यात लक्षवेधी ठरणार्या पाटण विधानसभा मतदारसंघात राजकीय घमासान सुरू झाले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पूत्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्यात काट्याची टक्कर आहे. शंभूराजेंना या निवडणुकीत महायुतीमुळे बळ मिळाले आहे. असे असतानाच त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने पाटण तालुक्यात चर्चेचा धुरळा उडाला आहे. शंभूराजेंनी विक्रमबाबांना गळाला लावून मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे.
विक्रमबाबा पाटणकर हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या सरदार घराण्यातील आहेत. विक्रमबाबांचे वडील बाळासाहेब हे स्वातंत्र्य सैनिक आणि शेकापचे धडाडीचे नेते होते. पाटण तालुक्यात ते भडकबाबा म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभाही लढविली होती. त्यातील एका निवडणुकीत ते पराभूत झाले आणि दुसर्या निवडणुकीत त्यांनी माघार घेतली होती. त्यामुळे लोकनेते बाळासाहेब देसाई हे बिनविरोध आमदार झाले होते.