साताराMinister Desai Visited Pusesavali: सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून सातार्यातील पुसेसावळी गावात उसळलेल्या दंगलीनंतर येथे खासदार उदयनराजे भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी गावात जाऊन सामाजिक सलोख्याचे आवाहन केले. पुसेसावळीतील जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई तब्बल दहा दिवसांनी पुसेसावळीला भेट दिली.
मृताच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन:पुसेसावळीत जाऊन पालकमंत्र्यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनतर त्यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. घटनेतील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच निर्दोष असणार्या कोणालाही त्रास होणार नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे. गावातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
निर्दोष व्यक्तींना त्रास होणार नाही:पुसेसावळीतील घटना दुर्दैवी आहे. ग्रामस्थांनी शांतता राखून कायदा, सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. प्रशासनाने गावात सलोखा प्रस्थापित केला आहे. पोलीस दोषींवर कारवाई करत आहेत. याप्रकरणी निर्दोष व्यक्तीवर कारवाई होणार नाही. त्यांना त्रास होणार नाही, याची प्रशासन खबरदारी घेईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिला.