महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चित्रा वाघ यांच्या आरोपांना फारसं महत्त्व देत नाही - राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे प्रत्युत्तर

गट शिक्षणाधिकार्‍यावरील कारवाईत कोणतीही ढिलाई नाही. भाजपाला महाविकास आघाडीची बदनामी करण्याव्यतिरिक्त कोणतेही काम उरलेले नाही. त्यामुळे अशा आरोपांना आपण महत्व देत नाही, असा टोला गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला.

राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे प्रत्युत्तर

By

Published : Jul 3, 2021, 12:34 AM IST

Updated : Jul 3, 2021, 1:01 AM IST

सातारा - भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सातारा येथे गृह विभागाच्या कामकाजावर केलेले आरोप अपुर्‍या माहितीवर आहेत. गट शिक्षणाधिकार्‍यावरील कारवाईत कोणतीही ढिलाई नाही. भाजपाला महाविकास आघाडीची बदनामी करण्याव्यतिरिक्त कोणतेही काम उरलेले नाही. त्यामुळे अशा आरोपांना आपण महत्व देत नाही, असा टोला गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला.

चित्रा वाघ यांच्या आरोपांना महत्व देत नाही

साताऱ्यात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रकार परिषद घेवून राज्यात महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असताना गृहखात्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता. तसेच महिला शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या गटशिक्षणाधिकारी धुमाळ याचे निलंबन झाले नसल्याने पालकमंत्री व गृहराज्य मंत्र्यांवर सडकून टीका केली होती. शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेवून याप्रकरणातील पोलीस दलाची भुमिका मांडली व चित्रा वाघ यांच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, "महाविकास आघाडीचे सरकार योग्य रितीने काम करत आहे. परंतु, भाजपाला सरकारची बदनामी करण्याव्यतिरिक्त काही कामच उरलेले दिसत नाही. सातारा जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याला ठाकरे सरकारचे प्रथम प्राधान्य आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात मी 13 जिल्ह्यांचे दौरे करून फिल्डवर काम केले आहे. या लॉकडाऊनमध्येही 9 जिल्ह्यात जावून पोलीस दलातील बैठका, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिल्डवर काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येवून चित्रा वाघ जे बोलल्या ते अपुर्‍या माहितीच्या आधारे बोलल्या."

पवारसाहेबांवर टिकेची ती रिअ‍ॅक्शन -

शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. महाविकास आघाडीचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांनी देशाच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा सुर्यासारख्या तेजस्वी व्यक्तीमत्त्वावर टिका करण्याअगोदर पडळकरांनी स्वतः कोण आहोत ते तपासावे. अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन असते तसेच पवारसाहेबांवर आरोप झाल्यानंतर पडळकरांच्या कारच्या काचा साहेबांवर प्रेम करणार्‍यांनी फोडल्या, अशा शब्दात त्यांनी समर्थन केले.

बंडातात्यांनी पायी वारीचा आग्रह धरू नये -

कमी वारकर्‍यांसह पायी वारीला परवानगी दिली तरी वारी ज्या गावातून जाणार आहे त्या गावात वारकर्‍यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांचे लोंढे येतील. गावा-गावात कोरोनाचा प्रसार होईल. याबाबत मी बंडातात्यांशी चर्चा करून पायी वारीचा आग्रह धरू नका, अशी विनंती केली आहे. आजही मी पुन्हा विनंती करतो की, पायी वारीऐवजी यावर्षीही बसमधून माऊलींची वारी न्यावी. यावर्षी एक बस जादा देण्याचा विचार केला आहे, असे श्री. देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. गटशिक्षणाधिकारी धुमाळ प्रकरणाच्या तपासात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या देखरेखीखाली तपास सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jul 3, 2021, 1:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details