महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'साताऱ्यातील टॉप टेन गुन्हेगारांवर मोकासह एमपीडीए कायद्याने कारवाई करू' - साता पोलीस कामगिरी न्यूज

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गृह खात्याचा कारभार घेतल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवतेज हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सातारा पोलिसांच्या कामगिरीची सविस्तर माहिती दिली.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई  यांची पत्रकार परिषद
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद

By

Published : Jan 19, 2021, 10:39 PM IST

Updated : Jan 19, 2021, 10:52 PM IST

सातारा - जिल्ह्यातील मोस्ट वाँटेंड टॉप टेन गुन्हेगारांची यादी बनविण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर मोका आणि एमपीडीए कायद्याने कठोर कारवाई करण्यात येईल. सातारा पोलिसांनी केलेल्या धडक कारवायांनी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 2020 मध्ये 58.41 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गृह खात्याचा कारभार घेतल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवतेज हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सातारा पोलिसांच्या कामगिरीची सविस्तर माहिती दिली.

टॉप टेन गुन्हेगारांवर मोकासह एमपीडीए कायद्याने कारवाई
गंभीर गुन्ह्यांत घट-शंभूराज देसाई म्हणाले की, सातारा पोलिसांच्या कामगिरीमुळे 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. खून 3 टक्के, दरोडा 8 टक्के , खूनाचा प्रयत्न 3 टक्के, जबरी संभोग 47 टक्के व घरफोडी 73 टक्क्यांनी कमी झाले आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 2019 मध्ये 35.5 टक्के होते. हे प्रमाण 2020 मध्ये 59 टक्क्यांवर पोहोचले आहे.



मोक्का व एमपीडीए शक्य

जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असणाऱ्या टॉप टेन गुन्हेगारांची यादी पोलीस अधीक्षकांनी तयार केली आहे. या निकषातील गुन्हेगारांवर मोक्का व एमपीडीए कारवाया होणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. एमपीडीएच्या दोन कुख्यात गुन्हेगारांवर तर मोक्काची ९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 149 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी 10 हजार 411 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

पोलिसांना दहा नवी वाहने

सातारा पोलिसांना नवीन दहा वाहने तसेच बीट मार्शल पोलिसांना डीपीसीत २ कोटी व सातारा शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मल्हारपेठ पोलीस स्टेशनला स्वतंत्रपणे मान्यता मिळाली आहे. चार पोलिसांची व ५६ कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारण्याची निविदा प्रक्रिया अंतिम केल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले. तापोळा परिसरातील ५२ गावे महाबळेश्वर पोलीस ठाण्याला जोडण्यात आल्याची माहिती यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले.

ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनावर कारवाईचा प्रश्नच येत नाही-

ग्रेड सेपरेटरच्या झालेल्या उद्‌घाटनासंदर्भात छेडले असता गृहराज्यमंत्री म्हणाले की, उद्‌घाटन झाल्याची मला माहिती नव्हती. होऊ घातलेल्या सरकारी उद्‌घाटनाची मला कोणतीही अधिकृत सूचना नाही. खासदार उदयनराजे यांनी ग्रेडसेपरेटरचे विनापरवाना उद्‌घाटन केल्याबाबत कोणीही कसल्याही स्वरूपाची तक्रार पोलिसांकडे अद्याप नोंदविलेली नाही. त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही. कोणत्या कामाला कोणती शिक्षा आहे, हे तपासण्याचे काम पोलीस करतात. त्यानुसार उद्घाटन होणे हा काही वादाचा विषय नाही, असे सांगत या प्रकरणावर अधिक भाष्य करण्याचे गृहराज्यमंत्र्यांनी टाळले.

Last Updated : Jan 19, 2021, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details