कराड ( सातारा ) - गर्दी टाळा, अनावश्यक घराबाहेर पडू नका आणि स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नागरिकांना केले आहे. जास्त लोकसंख्येच्या गावात झालेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देसाईंनी कराडच्या विश्रामगृहावर अधिकार्यांची बैठक घेतली. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांहून जास्त असले तरी, कोरोना रुग्ण सापडणार्या गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांमार्फत जनजागृती करण्याच्या सूचना महसूल, ग्रामविकास विभागांना देसाई यांनी केल्या आहेत.
कराड शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करणे टाळावे, आवश्यकता नसताना घराबाहेर पडणे थांबवले पाहिजे. मास्कचा वापर कटाक्षाने करावा, असे देसाई म्हणाले. यावेळी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. खैरमोडे व डॉ. धर्माधिकारी आदी जण उपस्थित होते.
अनलॉकमुळेे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. स्वत: जनतेनेच आता स्वयंस्फूर्तीने कोरोनाचा सामना करायचा आहे. मास्क वापरला पाहिजे, गर्दीत जाणे टाळले पाहिजे, गरज नसताना घराबाहेर जाणे टाळले पाहिजे, या सर्व गोष्टी जनतेच्या हातात आहेत. त्याचे पालन लोकांनीच करावे, असे आवाहन देसाई यांनी केले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई बोलताना... कराडमधील ऑक्सिजन बेडचे नियंत्रण प्रातांधिकार्यांनी करावे. पाटण तालुक्यातील कोविड रूग्णांना कराडमधील रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत नाहीत. सगळयाच रुग्णालयात कोरोनाबाधितांची गर्दी आहे. परंतु, पाटण तालुक्यातील अत्यवस्थ रुग्णांना कराडच्या रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेशही गृहराज्यमंत्री देसाई यांनी प्रातांधिकार्यांना दिले आहेत.
सातार्यातील जम्बो कोविड सेंटरसाठी प्रयत्नशील -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातार्याला तातडीने जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यास मंजुरी दिली. हे सेंटर लवकरात लवकर सुरु करण्याचा आपला आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा प्रयत्न सुरू असल्याचे देसाई म्हणाले. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचेही शंभूराज देसाई यांनी सांगितलं.