सातारा - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. कृपाशिर्वादाचा हात अखंड महाराष्ट्रावर कायम रहावा हेच मागणे गणरायाला मागितले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांनी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष केला.
सातारा नगरपालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरात कृत्रिम तलावाची उभारणी केली आहे. पालिकेने हा तलाव शहरातील हुतात्मा स्मारक येथे तयार केले आहे. या कृत्रिम तलावात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन केले. या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, 'कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी आपण सर्वांनीच साध्या पद्धतीने गणरायाचे स्वागत केले. धार्मिक वातावरणात सात दिवस गणरायाचा उत्सव साजरा केला. आज मांगल्याच्या वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देत आहोत.'