सातारा- पाटण विधानसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षात मी कोट्यवधी रूपयांचा विकास केला आहे. तरीही विरोधकांना जर विकास दिसत नसेल, तर त्यांच्या बोटाला धरून मतदारसंघात फिरवून त्यांना विकास दाखवू का? असा उपरोधिक टोला आमदार शंभूराज देसाई यांनी विरोधकांना लगावला. पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे गावात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा -आम्हीच पृथ्वीराज चव्हाणांचे १९९९ ला डिपॉझिट वाचवले; उंडाळकरांचे हल्लासत्र सुरूच
कराड दक्षिणमधील सुपने मंडल हे 2009 मध्ये पुनर्रचनेमुळे पाटण मतदारसंघात समाविष्ट झाले. त्याला आता 10 वर्षांचा काळ लोटला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सुपने गावाच्या पुनर्वसनासाठी आपले आयुष्य वेचल्याचे सांगून देसाई म्हणाले, सुपने मंडल आणि देसाई कुटुंबाचे जवळचे आणि आपुलकीचे ऋणानुबंध आहेत. 2009 पर्यंत या विभागाचे नेतृत्व कराड दक्षिणचे माजी आमदार, लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर करत होते. त्यांनी या विभागाच्या विकासाला विकासाची कमरता कधीही भासू दिली नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपण सुपने मंडलात गाव तेथे विकास ही संकल्पना राबविली.