सातारा - जे पेरलं तेच उगवलं या म्हणीचा दाखला देत माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. 1978 साली शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला होता. आज त्याच शब्दात निसर्गाने शरद पवारांना उत्तर दिले असून, सख्खा पुतण्याच तुमच्याविरुद्ध गेला असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर शालीनीताई पाटील यांनी प्रथमच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिखर बँकेतील कोट्यावधीचा भ्रष्टाचार उघड होईल, या भीतीपोटी सत्तेचं पांघरून घेण्याचा अखेरचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत असल्याचेही त्या म्हणाल्या. तुम्हाला सत्तेचं पांघरून थोडावेळ उपयोगी पडेल परंतू, एवढा मोठा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी कोणीही केंद्रीय वरिष्ठ नेते तयार होणार नाहीत. या भ्रष्टाचारामध्ये अजित पवार यांच्या इतकेच शरद पवारही जबाबदार असल्याचे शालिनीताई म्हणाल्या.
शालीनीताई पाटील या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. 1978 साली काँग्रेसमधून 40 आमदारांसह बाहेर पडून शरद पवार यांनी पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सरकार बनवले होते. वसंतदादा पाटील यांच्याशी बंडखोरी करत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दगाफटक्याचे राजकारण केल्याचा आरोप आजही त्यांच्यावर केला जात आहे. यानिमित्ताने 'दादांच्या पाठीत खंजीर खुपसला' अशी म्हण राजकारणात रूढ आहे.