कराड (सातारा) - कराड तालुक्यातील कोळे गावची कन्या शकीला शेख ही बीएसएफच्या (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) 89 बटालियनमध्ये दाखल होऊन सीमांचे रक्षण करण्यास सज्ज झाली आहे. पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये तिचे पोस्टिंग झाले आहे. बीएसएफमध्ये भरती होणारी सातारा जिल्ह्यातील ती पहिली मुस्लिम तरूणी ठरली आहे. (Shakila Selected In BSF) आपल्या कर्तृत्वाने तिने कोळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुट्टीवर गावी आलेल्या शकीलाचे मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.
शकीलाची बीएसएफच्या बटालियनमध्ये निवड झाल्यानंतर गावकऱ्यांकडून सत्कार मंडप व्यवसाय करून मुलांना शिकवले -शकीलाचे वडील अमीर शेख यांचा मंडपाचा व्यवसाय आहे. बेघर वस्तीतील दहा बाय दहाच्या खोलीत सहा जणांच्या कुटुंबासह राहणे शक्य नसल्याने ते भाड्याच्या खोलीत राहू लागले. पत्नी मलिका या शेतमजुरीने कुटुंबाला हातभार लावत होत्या. त्या जोरावर त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले.
बारावीनंतर सुरू केली तयारी -मुलींमध्ये शकीला सर्वात धाकटी. तिने बीएस्सीची पदवी घेतली. तत्पुर्वी बारावी पास झाल्यानंतरच तिने आर्मी भरतीच्या पूर्व तयारीला सुरूवात केली. कोळेवाडीच्या गणपती मंदीर परिसरातील पठारावर ती सराव करायची. कोळे ते तळमावले गावापर्यंत धावत जायची. लहान भाऊ साहेल हा तिच्या समवेत जायचा. बीएस्सी झाल्यानंतर शकीलाची बीएसएफमध्ये निवड झाली. शकीलाला सैनिकी वेशात पाहून आई-वडीलांचा ऊर अभिमानाने भरून आला.
अन् 89 बटालियनमध्ये दाखल -शकीलाने (2018)मध्ये परीक्षा दिली होती. जानेवारी (2021)मध्ये परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मार्च (2021)मध्ये जॉईनिंग लेटर प्राप्त झाले आणि ट्रेनिंगसाठी ती पंजाबला रवाना झाली. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर (89)बटालियनमध्ये ती दाखल झाली. पंजाबमधील गुरूदासपूरमध्ये तिला पहिले पोस्टिंग मिळाले.
पंचक्रोशीत तिचे कौतुक - राज्यपालांच्या उपस्थितीत खडका कॅम्प पंजाब येथे तिच्याबरोबर महाराष्ट्रातील 62 तरूणींचा शपथविधी झाला. शपथविधीनंतर पंधरा दिवसांच्या सुट्टीवर ती आपल्या कोळे गावी आली आहे. कराडची मुलगी 89 बटालियनमध्ये दाखल झाल्याने कोळे पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे.
वाढदिवसालाच हाती पडले जॉईनिंग लेटर -शकीला हिची 23 मार्च ही जन्म तारीख. आपल्या वाढदिवसालाच तिला सुखद धक्का बसला. 23 मार्च 2021 रोजीच तिला जॉईनिंग लेटर मिळाले. तसेच, ट्रेनिंगनंतर बीएसएफमधील तिच्या आयुष्यातील हे योगायोग अविस्मरणीय आहेत. असे शकीलाने सांगितले. तसेच, मी कितीही उच्च शिक्षण घेतले असते तरी मला सैन्य दलातच जायचे होते. अस ती सांगते.
मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले - माझ ध्येय ठरले असल्याने मी अन्य नोकरीचा विचार केला नव्हता. बारावी पास झाल्यानंतर मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली होती. रोज धावणे, डोंगर चढणे, असा सराव नित्यनेमाने सुरू होता. मला माझ्या कष्टाचे फळ मिळाले. त्याचबरोबर आई-वडीलांनी आमच्या शिक्षणासाठी आणि पालनपोषणासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज करू शकले, याचे समाधान असल्याचेही शकीलाने सांगितले.
शकीलाच्या सत्कारासाठी मान्यवरांची रिघ -बीएसएफमध्ये निवड झालेली शकीला शेख ही गावी आल्याची बातमी समजताच तिच्या सत्कारासाठी मान्यवरांची रिघ लागली. कोळे ग्रामस्थांनी तिच्या अभिनंदनाचे संपुर्ण गावात बॅनर लावले. गावच्या वेशीपासून तिची जंगी मिरवणूक काढली. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून आबालवृद्धांनी तिच्यावर पुष्प वर्षाव केला. महिलांनी गळाभेट घेत शकीलाचे कौतुक केले.
खर्या लढाईची सुरूवात आपल्या घरापासून होते - शकीलासोबत तरूणींनी सेल्फी घेतले. युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी देखील कोळे गावात येऊन शकीलाचा सत्कार केला. शकीलाने सातारा जिल्ह्यातील तरूणींना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने तरूणी देशसेवेकडे वळतील. मुलींवर अनेक बंधने असतात. परंतु, खर्या लढाईची सुरूवात आपल्या घरापासून होते असही ते म्हणाले.
असे पालक सर्व मुलांना मिळावेत - कुटुंबाची परवानगी मिळते न मिळते. परंतु, शकीलाला तिचे वडील अमीर शेख यांनी परवानगी दिली. त्यामुळे शकीलाच्या जिद्दीला बळ मिळाले. शकीलाच्या आई-वडीलांसारखे पालक सर्व मुलांना मिळावेत. शूर-वीरांच्या सातारा जिल्ह्याची परंपरा शकीलाने जपली आहे, असे शिवराज मोरे म्हणाले.
हेही वाचा -डॉ. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा घेणार गोव्याच्या 'मुख्यमंत्री' पदाची शपथ; 'या' दिग्गजांची राहणार उपस्थिती