सातारा - अश्लील व्हिडिओ काॅलचे रेकाॅर्डींग करुन शाहूपुरीतील डॉक्टाराकडून 12 लाखांची खंडणी उकळणाऱ्या तीन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. खंडणीच्या रकमेतून खरेदी केलेले 12 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने हस्तगत झाले आहेत. फौजदारी कारवाई, मोर्चा काढण्याची व बदनामीची धमकी देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावून खंडणीची रक्कम नेण्यासाठी आलेल्या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे.
अश्लील व्हिडिओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत डॉक्टरकडून खंडणी उकळणाऱ्या महिला गजाआड - shahupuri police news
व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ कॉल करुन त्याचे रेकॉर्डिग करुन ते व्हायरल करण्याची धमकी देत एका डॉक्टराकडून पैसे उकळले जात होते. खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात दोन महिला व एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यातील अल्पवयीन तरुणीला घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले असून दोघा महिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे, यातील तक्रारदाची या महिलांबरोबर व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती. यातील एका महिलेशी वाॅट्सअॅप व्हीडिओ काॅलवर अश्लील चॅटचे या महिलांनी रेकाॅर्डींग करुन ठेवले होते. नंतर ते रेकाॅर्डींग व्हायरल करुन पोलिसात तक्रार देण्याची, बदनामी करण्याची व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्या देऊ लागल्या. त्यापोटी त्यांनी डॉक्टराकडे 60 लाख रुपयांची खंडणी मागितली. डॉक्टराने बदनामीच्या भितीपोटी महिलांना 5 ऑगस्टला 12 लाख रुपये रोख दिले. त्यानंतर पैशांसाठी चटावलेल्या या महिलांनी उर्वरीत 48 लाख रुपयांसाठी तगादा लावला. त्यापैकी 20 लाखांची मागणी झाली. आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्याने डॉक्टराने शाहूपुरी पोलिसांत धाव घेतली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. संशयित माहिलांनी फोनवर सरकारी पंचांसमक्ष पैशांची मागणी केली. 20 लाखांपैकी एक लाख रुपयांची तजवीज झाल्याचे सांगितल्याने शुक्रवारी (दि.25 सप्टें.) रात्री तिन्ही महिला पैसे घेण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी गेल्या. तक्रारदाराकडून खंडणीची रक्कम स्वीकारल्यानंतर दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी तिघींनाही रंगेहाथ पकडले.
दोन महिलांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन युवतीला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या महिलांनी यापूर्वी उकळलेल्या खंडणीच्या 12 लाख 5 हजार रुपयांतून सोन्या-चांदीची दागिने खरेदी केले होते. दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. अटकेतील संशयितांना 29 सप्टेंबरपर्यंत पोली कोठडीत रवानगी केली आहे.
हेही वाचा -मराठा आरक्षणप्रश्नी पुण्यातील बैठकीसाठी उदयनराजे, शिवेंद्रराजेंना विनायक मेटेंचे निमंत्रण