सातारा - दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमधून आलेल्या सातारा जिल्ह्यातील ७ मुस्लीम बांधवांपैकी 3 जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर इतर ४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याची माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात निजामुद्दीन येथे झालेल्या मरकजला उपस्थित राहून आलेल्या काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.
मरकजमधून आलेल्या साताऱ्यातील तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह, ४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत - कोरोना न्यूज
दिल्लीतील मरकजमधून सातारा जिल्ह्यातील ७ मुस्लीम बांधव आले होते. त्यापैकी 3 संशयिताचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर इतर 4 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सातारा जिल्ह्यातील ७ मुस्लीम बांधव या मरकजला गेले होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी तिघांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो रिपोर्ट निगेटिव्ह असून इतर ४ जणांचे अहवाल प्रलंबीत आहे.
सातारा जिल्ह्यातील परदेश प्रवास करुन आलेले 16 व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 3 असे एकूण 19 नागरिकांना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.