रहिमतपुरातून सातशे पूरग्रस्त कुटुंबांना भरीव मदत - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळ सरसावले
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने भरीव मदत करण्यात आली. पंचक्रोशी परिवारातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी आर्थिक योगदान देत रहिमतपूर व परिसरात फेरी काढून पूरग्रस्तांसाठी निधी जमवला. रहिमतपूर 'पंचक्रोशी'ने सातशे कुटुंबांना भरीव मदत करत एक सामाजिक पाऊल टाकले.
सातशे पूरग्रस्त कुटुंबांना भरीव मदत
सातारा- कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड व नरसोबाची वाडी हा परिसर पूर्ण जलमय झाला होता. पूर ओसरल्यानंतर आता विविध संस्थांकडून मदतकार्य सुरु झाले आहे.
आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा त्यांनी कृतीने जपली. पंचक्रोशी परिवाराला निरोप देताना पूरग्रस्त महिला भावनिक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या माध्यमातून वाट करुन दिली. तुम्ही खऱ्या अर्थाने आज आम्हा पूरग्रस्तांना मदत करीत आमचा फाटका-तुटका संसार सांधण्यासाठी आधार दिला. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं श्रेष्ठ असते अशी कृतज्ञतेची भावनाही अर्जुनवाड मधील काही महिला व नागरिकांनी व्यक्त केली. महापुरामुळे आम्ही पुरते कोसळलो. पण ताई, दादा..! तुम्ही देवदूत म्हणून आमच्या घरात आला. भरीव मदत केली हे दातृत्वाचे हात आमच्या पाठीशी सदैव असावेत. हे नातं अखंड टिकावं यासाठी अर्जुनवाड गावातील वीस-पंचवीस महिला एकत्र आल्या आणि त्यांनी प्रत्येकाला राख्या बांधत आपली भावा-बहिणीचे नाते अधिक घट्ट केले.