सातारा - साताऱ्यात नटराज मंदिरासमोर झालेल्या अर्जुन मोहन यादव ( Arjun Mohan Yadav Murder) या वाईतील तरूणाच्या हत्येचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर दोघांचा शोध सुरू आहे. तरूणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बोगस खाते ( Bogus account on Instagram ) काढून अर्जुनसोबत मैत्री केली. त्याला प्रेमाच्या ( love trap ) जाळ्यात ओढून भेटायला साताऱ्यात बोलावून घेतले. त्यानंतर नटराज मंदिरासमोर अर्जुन मोहन यादव या तरूणाच्या डोक्यात गोळ्या घालून त्याचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी घातल्या गोळ्या -मृत अर्जुन यादव याने काही महिन्यापूर्वी वाईतील एमआयडीसी परिसरात गोळीबार केला होता. तसेच वाढदिवसादिवशी भैय्या नामक तरूणाच्या घरासमोर फटाके वाजवले होते. तेव्हापासून पाच जण अर्जुनच्या मागावर होते. मात्र, अर्जुन तडीपार होता. तसेच तो पुण्यात वास्तव्यास होता. त्यामुळे संशयितांनी शक्कल लढविली. तरूणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बोगस खाते उघडून अर्जुनशी मैत्री केली. चॅटिंग करत त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. साताऱ्यात भेटायला बोलावल्यानंतर तो एका मित्रासोबत शनिवारी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आला होता. नटराज मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येताच मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्याच्या डोक्यात पोटात गोळ्या घातल्या आणि पसार झाले.