कराड (सातारा) - कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र अद्ययावत कोरोना तपासणी केंद्र (कोविड ओपीडी) उभारण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार साकारण्यात येत असलेले हे केंद्र लवकरच नागरी सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
कृष्णा हॉस्पिटलमधील स्वतंत्र कोरोना वॉर्डमध्ये सध्या २०५ हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत ४५२ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे संशयित रुग्णांबरोबर ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, असे लोक स्वत:हून तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येत आहेत.
संशयित रुग्णांची योग्य पद्धतीने आणि सुरक्षितपणे तपासणी करता यावी, यासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या परिसरात हे स्वतंत्र कोरोना तपासणी केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात अद्ययावत सुविधा आणि प्रशिक्षित स्टाफ नियुक्त केला जाणार आहे. तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर आणि शारिरीक अंतर राखणे बंधनकारक असेल. याठिकाणी सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची तपासणी करुन आवश्यकता असल्यास स्वॅबची चाचणी करण्याची सोयही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्या रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेण्यात येतील, त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट त्याचदिवशी रात्री 9 वाजेपर्यंत कळविला जाणार आहे.
अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्पची सोयही या कोव्हिड ओपीडीत करण्यात आली आहे. तसेच रुग्णांचे तज्ज्ञांमार्फत समुदेशनही केले जाणार आहे. हे केंद्र लवकरच नागरिकांसाठी खुले केले जाणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
त्यांची'ही होणार तपासणी...
ज्या नागरिकांना नोकरीवर रुजू होण्यासाठी अथवा अन्य काही कारणांसाठी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींची कोरोना तपासणी आणि चाचणीची सोयदेखील याठिकाणी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच चाचणीचा रिपोर्टही एका दिवसात मिळणार आहे.