सातारा - खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांसाठी बंद करण्यात आली होती. तसेच, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यातच आता खबरदारीचा उपाय म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीवर देखील सुरक्षा वाढवण्यात आली ( Security Increased Afzal khan Tomb ) आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, 'अफजल खानची कबर ही 2005 पासून प्रतिबंधित क्षेत्र आहे. तिथे अतिरिक्त पोलीस दलाची भेट, हा नित्याचा एक भाग होता. संवेदनशील ठिकाणांना नियमीत भेट दिली जाते. त्याचअंतर्गत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीला भेट दिली.'
अफजल खानाची कबर असलेल्या भागात वातावरण बिघडवण्याचा कट रचला जात असल्याची माहिती नुकतीच पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली, असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या वेळी रॅपिड अॅक्शन फोर्सची 102 बटालियन आणि 15 क्यूआरटी जवान कबर परिसरात उपस्थित होते. त्याचवेळी महाबळेश्वर पोलीस, नवी मुंबई जलद कृती दलाचे जवानही या काळात कबरीभोवती तैनात होते. या पाहणीनंतर महाबळेश्वरमधील विविध समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशीही अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यासोबतच त्यांना सतर्क राहून शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
काही दिवासांपूर्वी एमआयएमचे नेते अकरबुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पुष्प अर्पण करत नतमस्तक झाले होते. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झालेला. तर, पुरातत्व विभागाने काही दिवस कबर पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली होती. मनसे नेते राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेत अफजलखानाच्या कबरीचा उल्लेख केला होता. तेव्हापासून हा परिसर चर्चेत आला आहे.
हेही वाचा -Kapil Sibal Resigns : कपिल सिब्बल यांचा काँग्रेसचा राजीनामा, सपाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल