सातारा -कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी म्हसवड नगरपरिषदेने विना मास्क रस्त्यावरुन फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी पालिकेने पोलीसांची मदत घेतली आहे. दरम्यान, कारवाई करत असताना नगरसेवक अकिल मैनुद्दीन काझी हे विनामास्क फिरताना दिसले. यावेळी पोलीस उपनिरिक्षक अमोल कदम यांनी नगरसेवकावरही दंडात्मक कारवाई करण्याची सुचना पालिका कर्मचाऱ्यांना केली. त्यामुळे भाजप आमदार गोरे गटाच्या या नगरसेवकाने पोलीस उपनिरीक्षकासह वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यान, त्याठिकाणी उपस्थित एका पत्रकाराने या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संबधित नगरसेवकांने पत्रकारांना फिरण्याचा परवाना कोणी दिला आहे अशी उलट विचारणाच केले. ते येवढ्यावर थांबले नाहीत तर पत्रकाराकडून कॅमेरा हिसकावण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी आम्ही आमचे काम करतोय असे पत्रकारांनी ठणकावताच त्यांनी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गरळ ओकत त्या ठिकाणाहून धुम ठोकली.