सातारा : साताऱ्यात भाजपच्यावतीने काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह समर्थकांनीही दांडी मारल्याने या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, महापुरुषांचा अपमान करण्यामुळे काँग्रेसची देशात वाताहत झाली असून महात्मा गांधी आणि पंडीत नेहरुंची काँग्रेस संपली असल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
काँग्रेसने आतातरी सुधारावे :काँग्रेस पक्ष आणि राहूल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. महापुरुषांना कमी लेखणे व त्यांचा अपमान करणे, यातून काँग्रेसची देशात वाताहात झाली आहे. महात्मा गांधी आणि पंडीत नेहरुंची काँग्रेस संपली असून आतातरी काँग्रेसने सुधारावे, अशी टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. तसेच, संभाजीनगर नामकरणाच्या विरोधातही काँग्रेसच खत पाणी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवेंद्रराजेंनी केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करण्याचाच हा प्रकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी हा त्याचाच दुसरा भाग आहे. हिंदू धर्माविषयी प्रेम असलेली जनता आगामी निवडणूकांत काँग्रेसला मतांच्या रुपाने झटका देईल, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
उदयनराजे दिल्लीत, कार्यकर्तेही अनुपस्थित :छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खा. उदयनराजे भोसले हे नवी दिल्ली येथे असल्याने ते गौरव यात्रेत हजर नव्हते. परंतु, त्यांच्या समर्थकांनी देखील गौरव यात्रेकडे पाठ फिरवली. त्यामुळे उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर, सावरकर गौरव यात्रेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आक्रमक होत कॉंग्रेस आणि राहूल गांधींवर टीका केली. यापुर्वी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपतींचा अवमान केला होता. त्यावेळी शिवेंद्रराजे यांची भूमिका एवढी आक्रमक पाहायला मिळाली नव्हती. तसेच भाजपबद्दलच्या निषेधाचा सूर नरमाईचा होता, हे देखील दिसून आले होते.