महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leopard Attack सातारा : बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या मुलाचा मृत्यू

कराड तालुक्यातील येणके गावातील इनाम नावाच्या शिवारात ऊसतोड सुरू असताना अचानक बिबट्याने मुलावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. या घटनेमुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Satara: Son of a sugarcane laborer killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या मुलाचा मृत्यू

By

Published : Nov 16, 2021, 7:18 AM IST

कराड (सातारा)- बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) ऊसतोड मजुराच्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कराड (Karad) तालुक्यातील येणके गावातील इनाम नावाच्या शिवारात ऊसतोड सुरू असताना अचानक बिबट्याने मुलावर हल्ला करून त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे. आकाश बिगाशा पावरा, असे मृत मुलाचे नाव आहे.

मुलाला शेतात ओढत नेले...

कराड तालुक्यातील येणके गावातील इनाम नावाच्या शिवारात सकाळी ऊसतोड सुरू असताना मजुरांची मुले बाजूला खेळत होती. त्यावेळी उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने एका मुलावर झडप घालून त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. बिबट्याने मुलावर हल्ला केल्याचे पाहून ऊसतोड मजूरही बिबट्याच्या मागे उसाच्या शेतात शिरले. सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत बिबट्याने मुलाला नेले होते. या हल्ल्यात मुलाच्या मानेतून बराच रक्तस्त्राव होऊन मुलगा गतप्राण झाला होता. या घटनेमुळे येणकेसह तांबवे परिसरात खळबळ उडाली आहे.

वन विभागाचा हलगर्जीपणा...

बिबट्याने मुलावर हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळाकडे धावले. ही बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे बघ्यांची देखील येणके गावात मोठी गर्दी झाली. गेल्या दोन महिन्यापासून दोन ते तीन बिबट्यांचा तांबवे परिसरात वावर आढळून येत आहे. दक्षिण तांबवे आणि चचेगाव (ता. कराड) येथे एक मुलावर आणि महिलेवरही बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे बिबट्याची दहशत होती. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कसल्याही हालचाली केल्या नव्हत्या. आता ऊसतोड मजुराच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे आता तरी वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करणार, असा संतप्त सवाल शेतकर्‍यांनी केला आहे.

येणके ग्रामस्थांनी बिबट्याला केले होते ठार...

पाच-सात वर्षापूर्वी येणके ग्रामस्थांनी बिबट्याला भाला-बर्चे मारून ठार केले होते. नागरी वस्तीजवळच्या उसाच्या शेतात बिबट्या शिरल्यानंतर शेताला वेढा देऊन ग्रामस्थांनी बिबट्यावर हल्ला चढवला होता. बिबट्याच्या हल्ल्यात काही तरूणही जखमी झाले होते. थकलेला बिबट्या तावडीत सापडल्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याला काठ्या, भाला, बर्चे मारून ठार केले होते. त्याच गावात बिबट्याने ऊसतोड मजुराच्या मुलाचा बळी घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details