जमावबंदी झुगारून सामाजिक संघटनांकडून पुसेसावळी घटनेचा निषेध सातारा Satara Riots : साताऱ्यातील पुसेसावळीत झालेल्या हिंसाचारामुळं जमावबंदी लागू करण्यात आलीयं. यामुळं सामाजिक संघटनांनी पुकारलेला मूक मोर्चा रद्द करण्यात आल्यानंतरही सामाजिक संघटनांनी ही जमावबंदी झुगारत तोंडाला काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुसेसावळी येथील हिंसाचाराचा निषेध केला. यावेळी संघटनांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, 2 ऑक्टोंबरपर्यंत कारवाई न झाल्यास गांधी जयंतीला तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनांकडून देण्यात आलाय.
जमावबंदी झुगारून केला निषेध : पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूक मोर्चा रद्द करण्याचा निर्णय झाला होता. संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना फक्त निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करुन निवेदनाचं जाहीर वाचन केले.
संघटना तसंच सर्वपक्षीयांकडून निवेदन : सामाजिक संघटना तसंच सर्वपक्षीयांच्या वतीने देण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय की, पुसेसावळीत घडलेल्या घटनेची सत्यशोधन समितीमार्फत चौकशी करावी. एका समाजाविषयी सातत्याने गैरसमज निर्माण करणारी वक्तव्ये करुन या समाजाविरोधात भडकावू वातावरण करणाऱ्या सूत्रधाराला अटक करावी. तसंच हिंसाचारात बळी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबाला २५ लाख रुपये भरपाई मिळावी, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. याचे पंचनामे व जबाब दबावाखाली झालेले असल्याने ते आम्हाला मान्य नसून फेर पंचनामे करावेत, अशीही मागणी सामाजिक संघटनांनी दिलेल्या निवेदनात केलीय.
अन्यथा गांधी जयंतीला आंदोलन : पुसेसावळीतील दंगली संदर्भात सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीयांकडून देण्यात आलेल्या निवेदनातील मुद्द्यांवर कारवाई न झाल्यास 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंतीला तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आलायं. यामुळं ऐन सणासुदीत प्रशासनावरील ताण मात्र वाढणार आहे.
हेही वाचा :
- Satara Riots Case : सातारा दंगल प्रकरण; सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांचा 'पीएफआय'शी संबंध?
- Satara Riots : साताऱ्यातील दंगलीप्रकरणी २३ संशयित ताब्यात; इंटरनेट सेवा मात्र बंदच
- Riots in Satara : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद