सातारा - दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव द्यावा, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गाय, बैल आदी जनावरांसहित जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर त्या ठिकाणी छोट्या सभेमध्ये त्याचे रूपांतर झाले.
राजू शेट्टी म्हणाले, राज्यात दररोजचे दूध उत्पादन 119 लाख लिटर आहे. 52 लाख लिटर हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर 330 रूपयांवरून 180 रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील चीन, युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे. देशात सध्या 1.5 लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत. तसेच बटरचा दर 340 रूपयावरून 220 रूपये झाले आहे. याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था 17 ते 20 रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत. दूध उत्पादक शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.
कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू; राजू शेट्टींचा इशारा - Raju Shetty on milk price
दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव द्यावा, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गाय, बैल आदी जनावरांसहित जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.
उत्पादन खर्चापेक्षा 10 रूपये कमी दराने शेतकर्यांना दूध विकावे लागत आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देऊन 25 रूपये लिटरला भाव द्यावा, या मागणीसाठी आम्ही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, जनावरांसहित आलो आहोत. सरकारने शेतक-यांच्या दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान त्वरीत द्यावे अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फलटण, माण भागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, सातारा भागाचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके तसेच सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, दूध संकलन केंद्र, व डेरी मालकांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -कोयना धरणाचे सहा दरवाजे तिसऱ्या दिवशीही ४ फुटांवरच; ९५ टीएमसी पाणीसाठा
हेही वाचा -कराडच्या प्रीतिसंगमावर गणेश विसर्जनाला मनाई; गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय