सातारा- पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली असून त्यांच्या जागी गडचिरोलीहून अजय कुमार बन्सल यांची सातारा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
दीड वर्षापूर्वी तेजस्वी सातपुते यांची पुण्यातून साताऱ्याला बदली झाली होती. प्रशासनाला आव्हान ठरलेल्या कोविड काळातही त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखली. गेल्या आठवड्याभरापासून सातपुते यांच्या बदलीची सातारा जिल्ह्यात चर्चा होती. या चर्चांकडे लक्ष न देता त्यांनी पोलीस दलाच्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. याच काळात अत्यंत गुंतागुंतीचा व पोलिसांचे कौशल्य पणाला लावणारे काळज येथील बालक अपहरण व खूनप्रकरण घडले. या गुन्ह्याचा तपास त्यांनी व त्यांच्या पथकाने कौशल्याने लावला होता. राजकीय कारणातून त्यांची बदली झाल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे.