महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉल्बी वाजवल्यास कारवाई होणारच; पोलीस अधीक्षकांचा सातारकरांना इशारा - action on dolby

अनेक गणेशोत्सव मंडळ डॉल्बी वाजवण्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्हा पोलीस प्रमुखांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शिवाय विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजू नये, यासाठी मिरवणुकीआधीच विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

By

Published : Sep 11, 2019, 10:17 AM IST

सातारा- गणेश विसर्जनावेळी डॉल्बी लावणाऱ्या मंडळांची ध्वनिक्षेपक यंत्रणा तत्काळ जप्त केली जाईल. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कारावास आणि दंडही होऊ शकतो. डॉल्बी वाजवल्यास कारवाई होणारच, असा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.

फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गणेशोत्सव मंडळाची बैठक आयोजित केली होती. पोलिसांनी गेल्या महिन्याभरापासून गणेश मंडळ, डॉल्बीमालक आणि चालकांचे डॉल्बीमुक्‍तीसाठी वेळोवेळी बैठका घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अनेक गणेशोत्सव मंडळ डॉल्बी वाजवण्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्हा पोलीस प्रमुखांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शिवाय विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजू नये, यासाठी मिरवणुकीआधीच विसर्जन मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

हेही वाचा - डॉल्बी पाहिजेच ओ, पोरं आहेत म्हणल्यावरती तेवढं तर लागणारच - उदयनराजे भोसले

डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन झाल्यावर सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन डॉल्बीमुक्‍त वातावरणात व्हावे, असा पोलिसांचा निर्धार आहे. त्याअनुषंगाने फलटण पोलिसांकडे ध्वनिमापक यंत्रे देण्यात आली आहे. ध्वनिमापक यंत्रांचा वापर करणाऱ्या पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉल्बी यंत्रणा वाजवणाऱ्या मंडळांवर तत्काळ जप्तीची कारवाई होईल. तसेच आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास डॉल्बीचालक व संबंधित मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केले जातील. या अंतर्गत दोषींना सश्रम कारावास होऊ शकतो. मंडळांनी आवाज मर्यादा पाळावी अन्यथा कारवाई अटळ आहे, असे तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details