सातारा - दोन खून, जबरी चोऱ्या, घरफोड्या, पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे असे तब्बल 16 गुन्हे दाखल असलेला, पाच तालुक्यांतील पोलीस स्टेशनला हवा असलेला धोकादायक गुन्हेगार जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शेतमजुराचा वेश करून तब्बल पाच दिवसांच्या मागानंतर पोलिसांनी ही कामगिरी यशस्वी केली..
कारवाईची माहिती घेताना आमचे प्रतिनिधी शैलेन्द्र पाटील वाईसह जावळी, सातारा, खंडाळा व कोरेगाव या पाच तालुक्यातील पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो गुंगारा देत गेली चार वर्षे फरार होता. फरार काळात त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबलेल्या नव्हत्या. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो वास्तव्याची ठिकाणं सतत बदलत होता. कोणत्याही तांत्रिक मदतीशिवाय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला उसाच्या शेताला वेढा मारून जेरबंद केलं. जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे (रा. सुरुर, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नावे आहे.
हेही वाचा-अश्लील चित्रफीत प्रकरणी अटकेनंतर कुंद्राच्या 'या' व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा
जक्कल कार्यरत असल्याचा सुगावा
वाई, जावळी, कोरेगाव, खंडाळा, सातारा या तालुक्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घरफोडी चोऱ्या होत होत्या. या चो-या उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर वाई तालुक्यातील जक्कल काळे हा संशयित कार्यरत असल्याचे समोर आले.
हेही वाचा-शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा
शेतमजुरांच्या वेशात मागावर
पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक रवाना झाले. सलग पाच दिवस हे पथक शेतमजुरांच्या वेशात जक्कलच्या मागावर होते. माहिती काढत काढत हे पथक कोरेगाव तालुक्यातील जक्कलच्या ठिकाणापर्यंत पोहोचले. डोंगरात एका झाडाखाली तो जेवत असल्याची पक्की बातमी या वेषांतर केलेल्या पोलिसांना मिळाली. पोलीस पथक तिथे पोचताच जक्कलला त्यांचा सुगावा लागला. त्याने जवळच्या ऊसात पळ काढला. परंतु पोलिसांनी तत्पूर्वीच ऊसाच्या शेताला वेढा घातला होता. तासाभराच्या झडती नंतर पोलिसांनी त्याला उसातून बाहेर काढले.
हेही वाचा-जबाबदारी झटकू नका, आमचे पैसे लुटू नका... पुण्यातील वेश्यावस्तीतील महिलांची आर्त हाक
पाच लाखांचा ऐवज हस्तगत
संशयिताला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडून घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून दहा तोळे दागिन्यांसह सुमारे पाच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. जक्कल काळेवर यापूर्वी खुणाचे दोन, जबरी चोरीचे दोन, घरफोडीचे नऊ, चोरीचे दोन, पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे असे तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, उत्तम दबडे, तानाजी माने, कांतीलाल नवघणे, संतोष पवार, प्रवीण फडतरे, संजय शिर्के, शरद बेबले व प्रवीण पवार यांनी यशस्वी केली.