सातारा - एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून लाखो रुपयांवर डल्ला मारणार्या आंतरराज्य टोळीचा शाहूपुरी पोलिसानी पर्दाफाश केला. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश राज्यात कार्यरत असलेल्या या टोळीचा म्होरक्या, साथीदारांसह सातारा पोलिसांच्या हाती लागला आहे. हरियाणामध्ये त्याच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांची वरात सातारपर्यंत आणली. सकरुद्दीन फैजरु (वय ३६) आणि रवि ऊर्फ रविंदर चंदरपाल (वय 33 दोघेही रा. पलवल हरियाणा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. हरियाणामध्ये कारमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना शाहूपुरी पोलिसांनी पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड आणि कार जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 व 21 सप्टेंबर रोजी राधिका चौकातील कॅनरा बँकच्या एटीएम मशिनशी छेडछाड करुन अनोळखी चोरट्यांनी हातचलाखीने 2 लाखाची रक्कम काढून नेले होते. यात बँकेची फसवणुक झाली होती. बँकेच्या मॅनेजरने दिलेल्या फिर्यादीवरुन शाहूपुरी पोलीस ठाण्यात 5 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची माहिती घेत असताना जिल्ह्यात काही दिवसांपासून बँकांचे एटीएममधून हातचलाखीने मोठ्या प्रमाणावर रोख पैसे काढण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले.