सातारा - मोबाईल चोरीच्या एका गुन्ह्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने प्रतापसिंह नगरातील संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे तब्बल 50 मोबाईल सापडले. पोलिसांनी या संशयिताकडून 5 लाख रूपये किंमतीचे 50 मोबाईल जप्त केले, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिली.
माहिती देताना पोलीस निरीक्षक तपासात नव्हती गती
पोलीस निरीक्षक मांजरे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 9 जानेवारी, 2021 रोजी रात्रीच्या सुमारास शिवराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संभाजी नगर येथे नविन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पत्र्याच्या उघड्या शेडममधून अज्ञाताने 10 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल लंपास केले होते. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पण, आरोपी हा अज्ञात असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार पडताळणी करुन देखील तपासात फारशी गती मिळत नव्हती.
पोलीस कोठडीत दिली कबुली
ही चोरी प्रतापसिंह नगरातील एकाने केल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले. अधिक तपासात त्यानेच शिवराज पेट्रोल पंप येथून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 5 हजार रूपयांचा एक मोबाईल हस्तगत करण्यात आला. पोलीस कोठडीत असताना केलेल्या अधिक चौकशीत त्याने विविध ठिकाणांहून मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरीचे 50 मोबाईल फोन हस्तगत करुन 5 लाख 700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक नानासाहेब कदम, हवालदार गुलाब जाधव, पोलीस नाईक अविनाश चव्हाण, जोतीराम पवार, शिवाजी भिसे, पोलीस शिपाई गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग व विशाल धुमाळ यांच्या पथकाने केली.
हेही वाचा -साताऱ्यात प्रशासनाने लावलेली टाळेबंदी अन्यायकारक; निर्बंध शिथिल करण्याची शिवेंद्रसिंहराजेंची मागणी