सातारा : सातारा नगरपालिकेतील लाच प्रकरणाच्या अनुषंगाने आज पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कसून चौकशी केली. ही चौकशी सुमारे अडीच तास चालली. दरम्यान या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या सर्वांची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
ठेकेदाराची अनामत रक्कम परत करण्यासाठी दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेणा-या सातारा नगर पालिकेचा उपमुख्याधिकारी संचित धुमाळ व आरोग्य निरीक्षक गणेश टोपे व प्रवीण यादव यांना पोलिसांनी मंगळवारी रंगेहाथ पकडले होते. तिघेही पोलिस कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील चौथा संशयित वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे अद्याप फरार आहे.
आरोग्य विभागातील या खाबुगिरीची एक व्हिडीओ क्लीप सध्या साता-यात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे. यात संशयितांच्या तोंडी आलेल्या नावाच्या व्यक्तींची चौकशी होणार असल्याचे संकेत, पोलिसांतील संपर्क सूत्रांनी दिले. यातील एक असलेले मुख्याधिकारी शंकर गोरे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी आज बोलावले होते. त्यानुसार श्री. गोरे पोलिसांपुढे हजर झाले. सुमारे अडीच तास कसून चौकशी झाल्याचे संपर्क सुत्रांनी सांगितले. या चौकशीतील तपशील समजू शकला नाही.
नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी..
पालिकेतील लाचखोरीच्या प्रकरणावरुन माहोळ उठल्याने सातारा पालिकेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. प्रशासनावर अंकूश नसल्याने असे दुर्दैवी प्रकार घडत आहेत, अशी टिका पालिकेतील विरोधी नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी केली आहे. तर माधवी कदम यांनी त्याच्या विरोधात प्रसिद्धीपत्रक काढले आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नैतिक जबाबदारी स्विकारुन त्यांनी राजीनामा द्यावा, असे श्री. मोने यांनी म्हटले आहे.