सातारा - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सातारा लोकसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत राहिला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, यावेळी सातारा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जाते. येथून आघाडीने राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर युतीकडून शिवसेनेचे नरेंद्र पाटील हे मैदानात उतरले आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात युतीने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे. उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही नेत्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. नरेंद्र पाटील यांना भाजपने आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपली उमेदवारी मिळवली. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांचा गोडवा गाणारे पाटील आज मात्र त्यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत.
पक्षीय बलाबल
सातारा जिल्ह्यात ११ तालुके आहेत. मात्र, 2009 साली माण-खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यातील काही भाग माढा मतदारसंघाला जोडला गेला. त्यामुळे सातारा मतदारसंघात सातारा, उत्तर कराड, दक्षिण कराड, वाई, कोरेगाव, पाटण हे ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये राष्ट्रवादीचे ४, काँग्रेसचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी १ जागेवर वर्चस्व आहे.
- सातारा - शिवेंद्रराजे भोसले (राष्ट्रवादी)
- कराड उत्तर - बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
- वाई - मकरंद पाटील (राष्ट्रवादी)
- कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)
- कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
- पाटण - शंभूराज देसाई (शिवसेना)
या मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.
२०१४ ची परिस्थिती
२०१४ साली या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले हे निवडूण आले होते. त्यांनी आरपीआयच्या अशोक गायकवाड यांचा पराभव केला होता. २०१४ च्या मोदी लाटेचा कसलाच प्रभाव या मतदारसंघावर झाला नाही. तर २००९ साली उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा पराभव केला होता.