साताऱ्यात गुलमोहर 'डे' उत्साहात साजरा; अबाल-वृद्धांची गर्दी
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कलाकार, रसिक व पर्यावरणप्रेमी गुलमोहर 'डे' मध्ये सहभागी झाले होते. दोन सत्रात गुलमोहर 'डे' साजरा करण्यात आला.
सातारा - गेली १७ वर्षे अव्याहतपणे गुलमोहराचे सौंदर्य साताऱ्यातील लोकांना समजावणारा गुलमोहर 'डे' बुधवारी साताऱ्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साताऱ्यातील अबाल-वृद्धांनी या उत्सवाला आवर्जुन हजेरी लावली.
पर्यावरण विषयक उपक्रम, जनजागृती तसेच ललित कला, साहित्य, संगीत, नृत्य आविष्काराच्या माध्यमातून निसर्ग आणि कला यांचा अनुभव गुलमोहर 'डे' दिवशी अधोरेखित केला जातो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कलाकार रसिक व पर्यावरण प्रेमी गुलमोहर 'डे' मध्ये सहभागी झाले होते. दोन सत्रात गुलमोहर 'डे' साजरा करण्यात आला. सकाळी चित्रकला मांडण शिल्पाचे प्रात्यक्षिके, मार्गदर्शन तर संध्याकाळच्या सत्रात काव्यवाचन करण्यात आले.