सातारा - जंगलांना वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मितीकरून जनजागृती करावी. वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजावेत, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
'वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाय करा' - बाळासाहेब पाटील वणवा उपाययोजना
सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागतात. त्यामुळे वन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
साताऱ्यातील वनविभागाच्या कार्यालयात पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीला उपवनसंरक्षक डॉ. भारतससिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक व्ही.जे.गोसावी, एस.बी.चव्हाण, फिरत्या पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल एस.एन. डोंबाळे, के.एस.कांबळे आदी उपस्थित होते.
उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जंगलामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करावेत. यामुळे मानवी वस्तीत पाण्याच्या शोधासाठी येणाऱ्या प्राण्यांना रोखने शक्य होईल, असे पालकमंत्री म्हणाले. पाटील यांनी या बैठकीत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत वन विभागाला प्राप्त होणारा निधी व सेवा सुविधांसाठी होणारा संभाव्य खर्च आणि वनविभागाच्या इतर विषयांचा सविस्तर आढावा घेतला.