सातारा -साताऱ्याला मिटींगसाठी जाताना पाटणचे डिवायएसपी अशोक थोरात हे मल्हारपेठ येथे वाहतूक कोंडीत अडकले होते. रस्त्यावर वाहतूक पोलीस नसल्याने थोरात यांनाच वाहतूक पोलिसांचे कर्तव्य पार पाडावे लागले. गाडीतून उतरून त्यांनी वाहतूक सुरळीत केली आणि ते साताऱ्याकडे रवाना झाले.
रस्त्यावर वाहतूक कोंडी
विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणची कामे अर्धवट स्थितीत आहेत. निसरे ते पाटण या दरम्यानचा रस्ता उकरण्यात आला आहे. तसेच रस्त्यात मातीचे ढिग टाकण्यात आले आहेत. छोट्या पुलांची कामेही अपूर्ण आहेत. यातच सध्या ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक करणार्या अवजड वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पाटण तालुका हद्दीत वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. याच वाहतूक कोंडीचा फटका पाटणचे डिवायएसपी अशोक थोरात यांनाही बसला.