सातारा- जिल्ह्यात काल (गुरुवारी) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 716 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 8 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
8 बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात आज शुक्रवारी आठ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात उकिर्डे (ता. माण) येथील 80 वर्षीय पुरुष, गोडोली (ता. सातारा) येथील 40 वर्षीय पुरुष, आरफळ (ता. सातारा) 40 वर्षीय पुरुष, दुर्गा पेठ (ता. सातारा) येथील 80 वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील 52 वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये ढोकळेवाडी (ता. खटाव) येथील 65 वर्षीय पुरुष, पंताचा गोट (ता. कराड) येथील 78 वर्षीय पुरुष, पारगाव ( जि. पुणे) येथील 48 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविडबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
कामगारांची तपासणी खासगीत करा
सातारा तालुक्यासह कराड, पाटण, वाई या तालुक्यांतील बाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. सर्व कामगारांचे भारत सरकारच्या निकषांनुसार लसीकरण करून घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत निगेटीव्ह आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र किंवा रॅपिड अँटिजन टेस्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत बाळगावे. त्याची मुदत 15 दिवस असेल. तसेच सर्व कामगारांचे आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजन टेस्ट सरकारी यंत्रणेमार्फत न करता खाजगी स्तरावरील लॅब कडून करुन घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.