सातारा - जिल्ह्यात लग्नविधी, अंत्यविधी आणि दशक्रिया विधी यासारख्या कार्यक्रमास 50 व्यक्तींपर्यंत परवानगी होती. तथापि या ठिकाणी गर्दी होत असल्याचे, दिसून आले. यामुळे ही मर्यादा आता 20 व्यक्तींपर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. याबाबतचे आदेश त्यांनी दिले असून त्यानुसार लग्नविधी, अंत्यविधी, दशक्रिया यासारख्या कार्यक्रमांना फक्त 20 व्यक्तींना ते ही सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नव्या आदेशानुसार अशा आहेत मर्यादा -
- वधू/वर वगळून जिल्ह्याबाहेरील इतर व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई
- प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई
- प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना अशा कार्यक्रमांना बाहेर जाण्यासही मनाई
- कोणत्याही प्रवासी बसेसना सातारा जिल्हाबंदी
- खासगी बसेसमधून येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीस प्रवेश पास मिळणार नाही
दरम्यान, सातारा जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांचा आकडा 498 झाला असून एकूण बाधितांची संख्या 1 हजार 418वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृतांचा आकडा 61 झाला आहे. मंगळवारी साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष व कृष्णा रुग्णालय कराड येथे पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 64 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच जावली तालुक्यातील पुनवडी येथील 60 वर्षीय पुरुषाला उपचाराकरिता क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.