कराड (सातारा) -लग्न कार्यास परवानगी घेतल्यानंतर बँड-बँजो वाद्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याचे साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जाहीर केले. यामुळे बँड-बँजो पथकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर काही महिने निर्बंध आले होते. टप्प्याटप्प्याने शासनाने कार्यक्रमांना परवानगी दिली. लग्न कार्यासाठी नियम-अटींसह परवानगी देण्यात आली. परंतु, बँड आणि बँजो पथकांसाठी स्पष्ट निर्देश नसल्याने सातारा जिल्ह्यातील बँड-बँजो वादक संघटनेच्या पदाधिकार्यांनी साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नुकतीच भेट घेतली. लग्न कार्यासाठी एकदा तहसील कार्यालयातून परवानगी घेतल्यानंतर वाद्य वाजवणार्या बँड आणि बँजो पार्टीला वेगळी मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.